सकाळची इडली - चटणी , अंताक्षरी , ट्रेक , रॅपलींग , सायंकाळचा चहा आणि अमाप गप्पा .
लोणावळा ड्यूक्स नोस रॅपलींगला जायचे ठरले आणि नियोजनानुसार सकाळी ६ वाजता चकाला , अंधेरी वरुन ट्रेकचे एक मुख्य नियोजक प्रविण हाडवळे आणि काही मित्रांसोबत सोबत प्रवासाला सुरुवात झाली . घाटकोपर , ठाणे , पनवेल , लोणावळा असे टप्पे करत सर्व गाडीत एकत्र झालो . सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती . पनवेलला नेहा बसमध्ये चढल्यावर त्रिवेणीने सर्वांकरता आणलेल्या इडली-चटणीचा नाश्ता सर्वांनी केला . सगळ्यांनी पोट भरून इडली - चटणी वर ताव मारला . नाश्ता झाल्यामुळे सगळे पुढच्या प्रवासाकरता सज्ज झाले . बसमध्येच अंताक्षरीचा डाव सुरू केला . मुलं विरुध्द मुली असा संघ करण्यात आला . अंताक्षरी खेळता खेळता दीड - एक तासाचा प्रवास कसा पार झाला हे कळलेही नाही . १० च्या सुमारास नियोजनानुसार ठरलेल्या गावात ट्रेकिंगच्या पायथ्याशी सर्व जमा झालो .
पायथ्याशी राज बाकरे सर यांनी सर्वांची एकमेकांशी ओळख करून घेतली आणि ट्रेकची थोडक्यात सर्वांना माहिती सांगितली . ११ वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली . ऊन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने सोबत पाण्याचा कॅन भरून घेतला होता आणि गावातूनच पाण्याच्या बाटल्याही भरून घेतल्या . अर्ध्या तासात आमची ट्रेकिंग संपूर्ण झाली . ट्रेकिंग पेक्षा जास्त कुतूहल रॅपलींगचे होते . माझ्यासारखेच बहुतेक जणांचे पहिलेच रॅपलींग होते . ड्यूक्सची उंची साधारण ३००-३५० फूटच्या जवळपास होती . आम्हा सर्वांना ट्रेकिंग पॉईंटला पोहोचण्या आधीच सुमुख सातवळेकर , विनय आपटे , तुषार भंगाळे , अभिषेक वैद्य , विश्वेश महाजन (सर्व सर , एकापेक्षा एक आणि सरस ) ड्यूक्सला पोहचले होते आणि त्यांनी ड्यूक्सला रोप (Rope) लावून त्याची बरोबर हाताळणी केली होती . ट्रेकिंग पॉईंटला पोहोचल्यावर सगळ्यांनी एका झाडाखाली विसावा घेतला .
सुरूवातीला नाही - नाही म्हणणारे सुद्धा रॅपलींग करता उत्सुक झाले होते . अमोल पाध्ये , ओंकार यादव , दुर्गेश रमाणी , ( सर्व सर ) आणि त्रिवेणी केसकर , वेदिका अष्टेकर , पल्लवी भोर ( सर्व मॅडम ) यांच्या साहाय्याने रॅपलींगसाठी पहिली ९ जणांची टीम सज्ज झाली . एक - एक करत सर्वांनी रॅपलींगचा अनुभव घेतला . सर्वांनी आपापल्या मनात रॅपलिंगची सुंदर दृश्ये टिपली . रॅपलींग करून परत ट्रेकिंग पॉईंटला जायचा परतीचा रस्ता अवघड होता , पण राज बाकरे आणि अमोल पाध्ये सर यांच्या मदतीने तो रस्ताही सगळ्यांनी सहज पार केला . ४.३० - ५ च्या दरम्यान सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला . परतत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर आज काहीतरी खास केल्याची भावना होती . आजूबाजूला निसर्गाचे सुंदर दर्शन होत होते .
ट्रेकिंगच्या पायथ्याशी परतल्यावर सर्वांनी अमोल सरांनी केलेल्या उत्कृष्ट चहाचा आस्वाद घेतला आणि या दिवसाची सांगता करण्यात आली . सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि परत लवकरच भेटण्याचे ठरवले . बसचा परत मुंबई कडे प्रवास सुरू झाला . सर्व आपल्याला घरी अगदी सुखरूप पोहचले .
आजच्या या यशस्वी आणि अविस्मरणीय दिवसाचे सर्वात जास्त अभिनंदन आहे ते " आम्ही गिर्यारोहक " च्या संपूर्ण टीमचे . आज ठरलेल्या वेळेत काही जणांमुळे थोडा उशीर झाला , पण पुढच्या वेळेपासून आपण सर्वच वेळेवर येण्याची खात्री घेऊ आणि या संपूर्ण टीमला थोडा का होईना हातभार लावण्याचा प्रयत्न करू अशी अपेक्षा . .
आम्ही गिर्यारोहकच्या संपूर्ण टीमला त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..
मी जीवनात जे काही क्षण साठवून ठेवले आहेत त्यामध्ये या दिवसाचा नंबर पहिल्या काही अविस्मरणीय क्षणात लागला . आणि माझ्या मते सगळ्यांच्याच आयुष्यातल्या पुस्तकातला हा दिवस सुंदर घडला असेल ...!!
