अख्ख्या climbing team ला दसऱ्याचे वेध लागलेले आहेत, पाऊस दडी मारून गायब झालेला आहे आणि सोप्पे ट्रेक करण्याची हौस पुरती भागलेली आहे, अशा पार्श्वभूमीवर रतन ते हरीश करायचे निश्चित झाले.
ठरल्याप्रमाणे आपापल्या वाटणीचे सामान घेऊन सर्व आवश्यक फोन नंबर मुंबईतील लोकांसोबतही देऊन आम्ही मध्यरात्रिची 12:07 कल्याणहून पकडली आणि कसाऱ्याला निघालो. ट्रेनमध्ये वैभवचा वाढदिवस सुमुखने आणलेला cake फस्त करून साजरा केला आणि गप्पा संपेतो कसाऱ्याला 1:30-1:45 पर्यंत पोहोचलो. आधीपासून राजने गाडी सांगून ठेवली होतीच, तिही हजर होती. मुंबईहून कसारा जितका व्याप झाला नसेल, तितका व्याप कसाऱ्याचे घाण करून ठेवलेले underground tunnel पाय सांभाळत पार करून गाडीजवळ जाईस्तोवर झाला. गाडीत 2 दिवसांचे भरमसाठ सामान आणि 13 जण फिट करून आम्ही 4-4:15 पर्यंत रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर गाठले.
अपूर्ण झोपेतच दर्शन घेऊन मंदिराचे मंद प्रकाशात फोटो काढून आम्ही मंदिरासमोरचा concrete(!) रस्ता पकडला आणि पुढच्याच वळणावर रतनच्या दिशेने जाणारी मोठ्ठली पाऊलवाट धरली. रात्रीच्या वेळी ट्रेक करता प्रत्येकाची एक विजेरी सोबत असणे अतिशय फायद्याचे असते. डावीकडे शेतं-जंगल तर उजवीकडे छोट्या आडव्या बांधातून वाहणारे पाणी अशी ही शेताच्या बांधावरून जाणारी वाट आहे. थोडं पुढे गेलो, की नदिचा प्रवाह कमी होतो तिथे crossing करून वाट पलिकडच्या काठाने जाऊ लागते. मागे एकदा indiahikes साठी Ratan gad लिहिला होता, त्यावेळी आम्ही सुरुवातीपासूनच नदीच्या ह्या काठाने शिरलो होतो. थोडा चढ थोडा उतार या ठळक वाटेवरून घेता घेता मध्ये बरेच spider webs परागने कॅमेऱ्यात टिपले. ते पार करता करता दोन्ही केसकर भगिनींच्या कपाळांनी अनावधानाने त्यांचा मोक्ष झाला, हे दुर्दैवच! या वाटेला परत ओढ्यातून crossing लागते. पुढे रस्ता confirm होण्याची चिंता असतानाच अभ्याला arrow दिसला आणि आम्ही खात्रीने पुढे झालो. रतनचा base हा horseshoe shape मध्ये वेढल्या गेलेल्या डोंगरराजीत दडलेला आहे. त्यामुळे पोहोचेतो बऱ्याच छोट्या छोट्या टेकड्या, ओढ्याच्या बाजूबाजूने जाणाऱ्या पाऊलवाटेवरून पार करत आपण बऱ्यापैकी height gain करणाऱ्या काही चढानंतर दक्षिण दिशेला तोंड करून त्या horseshoe आकाराला पाहू शकू अशा मोकळ्या रस्त्यावर येतो. इथे मात्र मध्येच वरती वळणाऱ्या काही चकव्या वाटा लागतात, बहुदा मधल्या टेकड्यांवर चरायला नेण्यासाठी रतनवाडीचे गावकरी त्या वापरत असावेत.आमच्यासोबत सर्वांकडे मोबईलमध्ये रस्त्याचे map, पराग कडे map printout सहित map track हे app होते. यावर आपण ऑफलाइन GPS द्वारे आपल्या चाललेल्या रूट ला follow करू शकतो, आणि मूळ map सह तुलना करून योग्य तो दिशेसम्बंधीत निर्णय घेऊ शकतो. Map बघून आम्ही ठरवलं, आपण आपली वाट सोडायची नाही. जवळपास पाउण तासभर तरी आत आत जात राहिलं, की डाव्या हाताला वरती ढगांमध्ये लपाछुपी खेळणारी रतनच्या बुरुजाची तटबंदी दिसते. इथे सरळ उजवीकडे घुसायचं की वाट बरोबर असेल, असा प्रश्न होता, कारण काही वाटा सरळ कुमशेत-कात्राबाई कडे जाणाऱ्यापण असण्याची शंका होती. राजच्या अग्निबाण शिखराच्या आठवणीनुसार लगेच रतनची वाट लागली पाहीजे, पण आम्ही गेलो होतो त्यानुसार तासभर चाल होतेच, अशा confusion मध्ये असतानाच अभ्या आणि प्रव्या थोडे पुढे जाऊन वाट confirm करून आले.
रतनगड चढणं म्हणजे जंगलात वेढलेले 3 मोठ्ठाले चढ पार करणं. प्रत्येक चढानंतर थोडी आरामाची सपाटी येते, तेव्हा पुढच्या चढासाठी ready व्हायचं. हरीश-रतन चिन्ह असलेला फाटा दिसल्यावरचा लास्ट चढ पार झाला, की शिड्या सुरु होतात. त्याआधीच मागच्या एका ठिकाणी आजोबा, कात्राबाई धुक्यात दडलेले नशीबानुरूप दिसतात. 3 पैकी 2 पुढच्या शिड्यांची 1 बाजू सद्ध्या बिकट अवस्थेत आहे, तरी सवयीने 1 वेळी 1 जण करत जाणे शक्य आहे. 3ऱ्या शिडीनंतर दरवाजा लागतो, तो पार करताच उजवीकडे गुहेसाठीचा मार्ग आहे. गुहेत चहा-नाश्त्याची सोय होते, पण आम्ही quick gas आणि सामान नेलं होतं त्यामुळे आम्ही काही जणांनी गुहेत थांबून चहा करायचा निर्णय घेतला. वैभव beginner असल्यामुळे याच ट्रेकने थकले होते, त्यामुळे त्यांनीही आराम करायची संधी साधली. चहा-बिस्किटे आणि कचोरीवर ताव मारून आमची आवरा-आवर होइस्तोवर बाकीचा ग्रुप नेढ्यापाशी जाऊन आला. गडाच्या शिड्या सोडल्या तर बाकी रस्ता सगळ्यांनी टपाटप पार केला आणि हरीश-रतन वळणावर आलो.
पुढचा ट्रेक दिवसभराचा रतन-कात्राबाई-कुमशेत-पेठाची वाडी-पाचनई असा 25-एक Km मोठा होता. गडाच्या शक्य तितक्या जवळ पोहोचायचं होतं. मनात तर आम्ही हरिश्चंद्रगडावर पोचलं पाहिजे ह्याच तयारीत होतो, फक्त अंदाजानुसार आज पाचनईत मुक्काम होईल हे दिसत होतं. 'ही वाट दूर जाते' ह्यात काही संशय नव्हता, आमच्या पुढे गावातून जाणाऱ्या 2 जणांनी हीच ती वाट हे नक्की केलं होतं. ते पुढे एका चढाच्या बाजूने जाणाऱ्या छोट्या वाटेने ते दोघं लुप्त झाले आणि आम्ही मोठी वाट की छोटी पेचात पडलो. मोठ्याने हाका मारून गावकऱ्यांकडून वाट निश्चित केली आणि मग मोठ्या वाटेनेच पुढे गेलो. थोड्याच वेळात भुक जाणवू लागली म्हणून सपाट जागी halt घेतला आणि निखिलकडची बिस्किट्स-खजूर, राहुल-परागने आणलेल्या काकड्या-फळांवर ताव मारला. आता पुढे डोंगराच्या काठावरून जाणारी हीच एक वाट होती! संपूर्ण traverse मारून होता होता मागे डावीकडे अग्निबाण शिखर स्पष्ट दिसू लागले. Crack मध्ये घुसून पुढे आतल्याच अंगाने वर जात राजने हे काही वर्षांपूर्वी सर केले होते त्याची माहिती घेतली आणि पुढे गेलो. समोर कात्राबाई घाटाचा टॉप दिसू लागला तसा सर्वांचा speed वाढू लागला. टॉप साठी आपण मधल्या एका घळीसारख्या वाटेने जाऊ लागतो, ही वाट अरुंद, ऊंच चढाची आणि खडकाळ आहे. मध्येच पावसासोबत आलेली झुडपं आणि झाडीही आहे. त्याकरता इतका वेळ मागे थांबलेला सुमुख पुढे कोयता घेऊन कामास लागला. सर्वांना सोईस्कर पडेल अशी वाट राहुल, पराग, सुमुख यांनी तयार केल्यावर आम्ही वर गेलो. मागे मात्र शेवटच्या टप्प्यात वैभव यांच्यासह अभ्या आणि राज त्याचा जोश वाढवत येत होते. चढाची वाट असल्यामुळे सोल्लीडच दमछाक झालेली जाणवत होती. वर पोचल्यावर पुढची पाहणी करण्यासाठी पराग राहुल सुमुख पलीकडे जाऊन आले. मागे रतन गड, अग्निबाण, डाव्या दिशेला पसरलेला घनचक्कर, कुमशेत गाव आणि तिकडचा कोम्बडा (जो आम्हाला वाटला तो) सगळे कळतील असा भन्नाट पॉइंट सापडला होता. आम्हाला टोचून बोलण्याची राजची 'सर'गिरी यशस्वी ठरली आणि आम्हीही तिथे जाऊन नकाशावारी आपण कुठे आहोत, कुठवर जायचे आहे, कितपत चाल आहे, वाटेत काय वगैरे पाहून आलो.
परत बाकीच्यांपाशी आलो आणि इथून पुढे उजवीकडून याच डोंगराला खाली जाण्याची रेखीव वाट दिसू लागते. मध्येच एका फाट्याला खाली की समोर असा प्रश्न असताना खाली सर्वजण घुसलो आणि उतरतानाच्या लीड ला माझा नंबर लागला. आता पोहोचतोय संध्याकाळपर्यंत याची sarcastic नोंद स्वत:शीच करून मी चालू लागले. मागे शुभम, निखिल, पल्लवी दिसू लागले की मी पुढे व्हायचे. वळणा वळणाने हे अंतर छान पार होत होते. एरवीचे लीडर लोक बहुदा वैभव सोबत आणताना change म्हणून रमत गमत येत होते, त्यांचा रमणीय स्पीड आमची असंही कसोटी असते, त्यामुळे एकूणच ग्रुप सोबत होता. मध्येच 2 जरासे हटके पॅचेस आहेत, ते पार करताना नव्यांसमोर shining मारून घेतली! ;) फटाफट फटाफट उतरता उतरता आम्ही मस्त धबधब्याच्या वरच्या सपाटीपाशी आलो एका स्पॉटला आणि इथेच जेवायचे हे परागने सांगितले त्याप्रमाणे डबे काढले. वेगवेगळ्या घरचे पराठे, दशम्या आणि पोळी भाजी चटण्या खाऊन तृप्त आत्म्यांसारखे आम्ही आडवे झालो. प्रत्येक वेळी पराग वेळ ठरवून द्यायचा: आत्ता 3:15 झाले आहेत, 3:40 ला बरोब्बर आपण निघतो आहोत असं म्हणून झालं आणि अवघ्या 5-एक मिनिटांत 3:40 कसे काय वाजले कळलेच नाही इतक्या गाढ झोपेतून आमची हकालपट्टी झाली! पाण्यापलीकडे काठात लागणारा उतार धरून झपाझप सगळे अगदी 10-15 मिनिटात पायथ्याच्या शेतांना लागले. थोडेफार इकडे तिकडे फोटो काढत आरामात तंद्रित सगळे गाव पार करत आहेत लक्षात येताच अभ्या, राज, पराग या serious मंडळींनी आमची शाळा घेतली: "आता इथेच गावातली फुलं पहायची आहेत, की पाचनई गाठायचं" अशा rhetoric प्रश्नाला अपेक्षित "जितकं शक्य आहे, तितकं फास्ट जाऊन गडाजवळ पोहोचूयात" असं as expected उत्तर मिळालं आणि पेठाच्या वाडीचा मार्ग आणि वेळ विचारून आम्ही निघालो. तो कुमशेतचा कोम्बडा नाही हे इथेच कळले. गावकऱ्यान्नी डावीकडे वळलात की 2 तास सांगितले आहेत, म्हणजे 3 लागणार हे नक्की होते. रस्ता डांबरी कंटाळवाणा होता, आणि last man स्पीड थोडा थकेला झाल्यात जमा होता, तरी हाताशी वेळ होता म्हणून सर्वजण खंबीर होतो.
इथे पुढे रस्त्याला 2 फाटे फुटतात, त्यातला आपण घ्यायचा उजवा हे ठरवताना थोडा विलंब झाला, आणि हा हा म्हणता एका कुरणाला लागतो धुकं जोरदार वाढलं. टप टप करत पावसानेही जोर धरायला सुरुवात केली त्यात वाट दिसत नसली, तरी वाट लागण्याची शक्यता सर्वांनाच जाणवत होती. धुक्यातली गरज म्हणून पूर्ण टीम एकत्र राहत होती आणि फक्त राज-पराग वाट पहायला पुढे-मागे map आणि छत्रीच्या सहाऱ्याने कार्यरत होते. वाट सापडलेय पण खात्री नाही अशी परिस्थिती होती. आम्ही जिथे थांबलो होतो, तिथे सुदैवाने एक आजोबा गुरं हाकत आले आणि त्यांनी खात्रीची वाट सांगितली. तिच धरून पुढे एक नदी पार करून जावे लागते. नदी पल्याड जाईतो छत्र्या-raincoat-windcheater असलेले सर्वजण भिजून गेले होते पण वाट मिळाल्याने सगळयांना हुरुप चढला होता. आजूबाजूला काही शेतातल्या लोकांना विचारून परत river crossing करून एका चढावर गेलो आणि पेठाची वाडी गाठल्याचा जल्लोश केला! इथून गावकऱ्यांनी proper डाम्बरी रस्ता असल्याचे दाखवले, पाऊसही थांबला होता. समोर कुमशेतचा कोम्बडा एकदाचा आरवलेला दिसला आणि त्याच्या पल्याड उजवीकडे नाफ्त्याचा कड पाहून सगळे relax झाले. दिवसभर चाल्लेले थके हारे लोक रस्ता डावीकडे वळला तेव्हा विश्रांतीसाठी अखेर बसले. गप्पा-गाणी सुरु झाली, गोळ्या वाटल्या आणि 10-15 मिनिटांनी परत चालू लागलो. वैदू, प्रविण, मी, निखिल, वैभ्या सुमुख एकत्र चालताना गप्पा मारत होतो, पुढे पल्लू, राज, राहुल्या, अभ्या, पराग, शुभम् याचं मार्गक्रमण सुरु होतं. थकलेल्या वैभवची bag सुम्याच्या पुढे लागली होती आणि प्रविणने सुमुख कडची 20एक kg भरलेली cylinder वाली bag exchange केली होती. एकमेका साह्य करून आम्ही धरलेला हा सुपंथ मात्र तास झाला तरी काही संपना! समोरून येणाऱ्या एका गाडीने अगदीच अजून 5 km आहेत सांगून मन अजूनच tense केले होते. एवढ्यात आमच्याच दिशेने जाणारी एक tracks गावली! गाडीत दोघंच जणं! फुकटात सोडतो असंही म्हणाले! भगवान देता है तो छप्पर फाड के म्हणतात तशी संधी होती! ती साधून, न फाटलेल्या छप्परावर 4, आणि खाली 9 जण घुसलो आणि आमच्या ताशी 5 च्या स्पीड ला 15 मिनिटांत पाचनई दर्शन झालं! इथे मंदिरासमोर आवार सफाई करून banner अंथरताच वैभव ढाराढुर पंढरपुरी रवाना झाले. कधी कधी उत्साहापायी आपण जोशात आग्रहाने येतो. अशावेळी परतीचा मध्यांतर मिळेलच, आपली तब्येत अनोख्या हवामानात साथ देईलच याची खात्री नसते, तर प्रत्येक वेळी सोबत येणाऱ्या सर्वांनीच येण्याचा निर्णय नि:शंकपणे अनुभवी trekkers वर सोडणे हा विश्वास अपेक्षित आहे. एक-एक step ने आधी सोप्पे, मग थोडे अवघड level मग हळू हळू अशा big time ट्रेकचं आव्हान घेणं रास्त आहे. पण म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या येणाऱ्या ट्रेकसाठी अनुभवातून मिळालेला धडा सोबतच्यांशी share करून पुढे जायचं.
आज रात्री full जय्यत दावत होती. गवती चहाचा आलं घालून बनलेला चहा स्वादच झाला होता! राजने बनवलेली खिचडीसुद्धा फक्कड! आम्ही गॅस वाले at work असताना अभु-सुमु यांनी भाज्या कापणे, पल्लू-वैदूने मुलींना changing चे घर हेरून आटोपणे, राहुल-शुभम-न झोपलेला वैभव-प्रव्या-निखिल वगैरेंनी पाणी आणणे आणि परागने राज च्या suggestion नुसार तेलाची पिशवी बांधून किड्यांची व्यवस्था लावणे ही कामं केलीन. दिवसभराच्या पायपीटीनंतरही सगळे खुश, fresh होते! वैभवलाही थोडंसं उठवून खाण्याचा आग्रह केला आणि उद्या राजूर मार्गे त्यान्ची सुखरूप रवानगी ठरली. मस्त गप्पा गोष्टी चेष्टा करत banner वर अंथरूणं घालून झोपलो आणि सकाळी 7 ला उठताना बहुदा त्यातच कालचा शीण मागे टाकून ताजेतवाने उठलो. 5:15 च्या बसने जोशीबुवा राजूर मार्गे मुम्बईला गेले होते. तासभरात चहा-बिस्किटं खाऊन, कार्यक्रम उरकून आवराआवर झाली आणि पाचनई to हरिश्चंद्रगड हा तसा lengthy but easy ट्रेक अशुद्धलेखन वाल्या बोर्डासमोरील खूणेसमोरून सुरु झाला. ही वाट सोपी आहे, ट्रेक ही अवघड नाही. ऊन थोडं चढू लागलेलं होतं पण टॉपची ओढ लागली होती. मध्ये रस्त्यात एक waterfall चा सुंदर पॅच आहे. इथे रेकी करून पुढील 'Event for farmers' donation' घ्यायचे final केले आहे! वरती मस्त डुंबता येईल अशा कुंडात उतरल्याविना राहावलं नाही. मनसोक्त भिजून, सूर मारून आम्ही पराग-राहुल वगैरे वैतागले असणार पुढे वाट बघत म्हणत आवरून रस्त्याला लागलो. लोकं आता वाढत होती. पण आमचा pace सही जमला होता! एका तासात मंदिरापाशी पोचलो आणि चक्रम हायकर्सच्या वरून नुकत्याच खाली निघालेल्या ग्रुपशी या मंडळींचे हितगुज झाले. पुढे आलेली मंडळी 50 मिनिटे निद्रासुख घेऊन बसली होती आणि 12 वाजले आहेत, बांधून आणलेली खिचडी संपवून, सफरचंद खाऊन 12:30 ला खाली उतरणं start व्हायला हवं हे decide झालेलं होतं. त्यामुळे कोकणकडा view miss करून केदारेश्वर मंदिरात दर्शनं घेऊन आम्ही मागे आलो. काय ती गर्दी! ते फोटो! तो आरडा-ओरडा! हरिश्चंद्र-तारामतीची खरी सत्वपरीक्षा अशा खुळ्या उल्हासाला सहन करणे हीच असावी बहुदा असे वाटले तिथे!
परतीचा रस्ता तोलार खिंडीतून खीरेश्वरमार्गे येणारा होता. याला एका 'well established' लिम्बु सरबत- ताक दुकानाजवळ 2 फाटे लागतात. डावा फाटा फार टेकड्या, टेकड्या चढ-उतारांचा आहे. उजवा फाटा बालेकिल्ल्यावरून पुढे 1-2 टेकड्यात आटोपतो. 31st december ला आल्यामुळे सुम्याला ही वाट माहीत होती त्यामुळे आम्ही तसेच चालू लागलो. वाटेत एका ब्रेकला प्रविणच्या जखमेवर danger औषध लावून, अजून उरलेले टोमॅटो संपवून परत उतरू लागलो.2 वाजून गेले होते. ही वाट सोप्पी असली, तरी मध्ये मध्ये बरेच rockpatches आहेत. पावसात ते निसरडे हमखास असतात, तरी फार छान qualityचा मला आवडणारा tension free उतरता येईल ऐसा दगड भरपूर आहे. त्यावरून सांभाळून आम्ही त्यातल्यात्यात weak लोकं सुमुखच्या मार्गदर्शनाखाली पुढे उतरू लागलो.
वर परागने वेळ ठरवताना 'मागच्यावेळी आपण सगळे चालणारे नेहमीचे होतो आणि 3:30 तास लागलेले' असं राहुलला म्हटलं होतं त्याची मजेमजेत सगळ्यांनी खिल्ली उडवली होती, 'एवढे हळू उतरलात!' वगैरे माजाची वाक्यं मारली होती आणि नवल म्हणजे ती खरी ठरली! आमचा अख्खा उतार संपून डाम्बरी रस्ता लागला, तेही पल्लवीच्या लीडसह निव्वळ 2.5 तासात! एवढा जोरदार शाही ट्रेक करून आल्यावर 4-4:30 ला हा शहरी रस्ता चालण्याचा एकाचाही मूड म्हणून होईना! तरी थोडे जबरदस्तीच सगळे सरसावलो आणि पाहतो तर समोर काय! वळणावर एक गाडी खरोखर आपल्याला पाहून प्रतिसाद देते आहे! या गाड्यांनी म्हणजे आमचं ह्या ट्रेकला तूफान स्वागत केलं होतं हो! फक्त 20 रूपये प्रति मानव अशा माफक दरात त्यांनी बऱ्याच लांबवर असणाऱ्या bus stop ला आमची जाण्याची सोय केलीन! (अजून उद्गारवाचक चिन्हं येणं बाकी आहे हो!) आम्हा 3 मुलींना गाडीच्या टपावर माझ्या पुढाकाराने (thank you बोलने की जरूरत नहीं है दोस्तों) बसायला मिळाले! रे selfie stick ने video चा photos चा माज! बरं, आत गाडीत वैभ्याकडून पार्टी चे विधेयक कायद्यात मंजूर झाले होते. जिथे स्टॉप, तिथेच समोर खाऊचे दूकान! चवीष्ट वडापाव, मिसळ पाव, क्रीम रोल, डबल चहा असा दबाके नाश्ता होऊनही स्वस्तात वैभ्याची सुटका झाली होती. प्रत्येकी ट्रेकचा खर्च ठरवून अभ्याकडे जमा करण्यात आला. इथून सुटणाऱ्या अनेको बसेस आहेत, कल्याण, ठाणे, पनवेल इत्यादी. आम्ही पावणेसहा वाजता एक कल्याणची बस पकडून मिळेल त्या जागी झोपून परतलो.
9:00 च्या पुढेमागे झोपेत कुठेतरी आमची बस कल्याणला पोहोचली आणि सगळ्यांनी आपापल्या मार्गी निरोप घेऊन या मोठ्ठल्या ट्रेकचा समारोप झाला. नव्या आलेल्या लोकांना जुन्यांच्या वागण्यातून coordination मधून खूप काही शिकायला मिळालं. खरं म्हणजे आम्ही गिर्यारोहक आणि निसर्गमित्र अशा दोन संलग्न संस्थांची आम्ही माणसं, मित्र, पण सह्याद्रीची बांधीलकी अफाट आहे, सर्वसमावेशक आहे. त्यामुळे संस्थांची बन्धनं कधी जाणवतच नाहीत. याचं त्याने ऐकावं, त्याने ह्याला मदत करावी, योग्य त्या वेळी आदराने लक्ष द्यावं seriously आणि योग्य वेळी मस्कारीची खिचाई करावी, काळजीने वाट बघणाऱ्या मुंबईत थाम्बलेल्यांशीही संपर्काद्वारे खुशाली रहावी, असा सगळाच experience share व्हावा हे मेटकूट या संपूटाशी छान जुळलं आहे. 'शायद है ये दोस्ती या ईमान का असर' पण तो असाच वृद्धिङ्गत होत राहो, आणि राहीलच!
