खूप events घेऊन आता आपल्या आम्ही गिर्यारोहक मंडळींपुरता एक नवा पण सोप्पा ट्रेक करुचया असं सारखं वाटत होतं. तांदूळवाडीला जायचं म्हणून डोंबिवलीची गाडीची वेळ ठरवली, आणि गाडी वेळेच्या (5:43 am) काही मिनिटे आधीच निघाली. 'गाडी गेली, फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला' वगैरे सेंटी अनुभव सोडून, 'आता काय?' असा आमचा विचार सुरु झाला, आणि शिवरायांनी बांधलेल्या गडान्पैकी तळागड व घोसाळगड करून बिरवाडीलाही जाऊन येऊयात असे फिक्स झाले.
Exploratory trek म्हणून हे दोन छोटे छोटे (30 - 45 minute) ट्रेक ठरल्यावर 6:00 ची दिवा-रोहा passenger पकडली आणि रोह्याला उतरून 'स्वादिष्ट'मध्ये भरपेट स्वादिष्ट नाष्टा केला. तिथून base village तळेला जायचं म्हणून गाड्या पाहिल्या. जवळपास दिवसाचे 2500 वगैरे घेऊन किंवा one way 1400 घेऊन यायला गाड्या मिळाल्या असत्या, पण कमी लोकं (7 जण: अभिषेक, सुमुख, त्रिवेणी, प्रविण, वैभव, प्रणाली, प्रणय) असल्याने तेही महाग, म्हणून आम्ही bus ची वाट बघू म्हटले. तेवढ्यात आम्हा मुलींना अजून research मारण्याची हुक्की आली, आणि मिशन असल्यासारखे सर्वजण चहुकडे स्वस्तातला स्वस्त पर्याय शोधू लागले! अखेरीस depot जवळच्या फुलवाल्यांच्या ओळखीने आम्हाला 1400 मध्ये full day गाडी मिळाली, आणि आम्ही रवाना झालो.
तळागड (तळ गड) रोह्याहून 20 km वर आग्नेयेस, तर घोसाळ गड रोह्याच्या अलीकडे दक्षिणेस 10 km वर आहेत. बसने गेल्यास मध्ये एका फाट्यापर्यंत परतून दुसरी बस घेता येते पण तिची वेळ सांभाळून गड करणे क्रमप्राप्त असते. आम्ही गाडीच केली होती आणि काका सुसाट drive करत होते त्यामुळे वेळेचं tension अज्जीबात नव्हतं. अर्ध्या तासात तळागडच्या तळाशी पोहोचून आम्ही चढायला सुरुवात केली. काही उपयोगी ब्लॉग्स वर मिळालेल्या माहितीनुसार तंतोतंत अनुभव आले. मोठ्ठा वाटणारा गड असला, तरी हा फटाफट height gain करून वरपर्यंत नेतो. रस्ता अतिशय सोप्पा आहे, सर्वांना जमेल असा आहे आणि किल्ल्यावर पहायला खूप सारे अवशेष आहेत. तटबंदीचा बराचसा भाग शाबूत असून काही डागडुजी करून जतन केलेला आहे. नव्या आणि जुन्या स्थापत्याचा एकत्र नमूना पाहून त्यावेळी सीमेंटशिवाय केलेलं हे दगडी बांधकाम नव्या लेपांपेक्षा किती सरस दिसतंही आणि भक्कम ही आहे, हे आवर्जून लक्षात येते. मध्ये एक हनुमानाची मूर्तीही आहे. किल्ल्याच्या माथ्यावर 45 मिनटात पोहोचलो. तेथील पिण्यालायक पाण्याचे टाके मात्र शेवाळलेले होते, एका डबक्यातील पाणी potable वाटले. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला चांगल्या पाण्याची स्वच्छ टाकी दिसतात. ती पार करून पुढे वरती टोकाशी गेल्यावर बुरुजावरून खालच्या तळे गावाचा view अप्रतिम वाऱ्यासह काही वेळ enjoy करता आला. खाली उजवीकडील पाण्याच्या स्रोतावरून तर काश्मीरच्या निषाद बागेच्या समोरील दृष्याची आठवण झाली! डावीकडे एक शिवाजी महाराजांचे मंदिर सुद्धा दिसले, महाराष्ट्रातील फार कमी गडांवर असे शिवस्मारक असावे.
15एक मिनिटांत खाली उतरल्यावर आम्ही दर्शन घेऊन पुढील प्रवसास लागलो. घोसळा गावात पोहोचताना 1 वाजून गेला होता. 4 वाजता रोह्याहून परतीची ट्रेन पकडून घरी Pro Kabaddi Finale बघायचा निश्चय करूनच प्रणाली आल्यामुळे आम्हाला वेळ गाठणं अपरिहार्य होतं. ( tongue emoticon ) येथे सुरुवातीलाच एक भवानी मंदिर आहे, ज्याच्या मागून गडाकडे जाण्याचा रस्ता दिसतो. अगदी सोपी पण थोडी चढ असलेली अशी ही वळणा वळणाची वाट आहे. एका टप्प्यावर पोहोचून आपण गडाचे 2 बाजूचे ऊंचवटे बघू शकतो. याच पॉइंट पाशी एक दरवाजा दिसेल जेथून खाली सरळ गावात उतरणारा मोठ्या पायऱ्या असलेला मार्ग आहे. डाव्या बाजूस वर जाता जाता उजवीकडे एक पाण्याचं टाकं लागतं. त्यापुढे मध्यापर्यंत चढल्यावर आपण उजवीकडून पुढे गेल्यावर काही गुहांच्या पल्याड गडाच्या टॉपला संपूर्ण प्रदक्षिणा मारू शकतो अशी वाट आहे, तीच continue करून आम्ही वरती चालू लागलो. वाटेत शंकराची पिंडी, एक मोठ्ठाली तोफ अशा spots वर photos काढून पुढे झालो. अगदी शेवटच्या टप्प्यात छोटासा रॉक पॅच आहे. तेवढा पार करून वर गेलं की सुंदर जंगल असलेला गडाचा टॉप होतो.
इथे थोडावेळ इकडे-तिकडे करून आम्ही खाली उतरू लागलो, वेळ कमी होता तरी प्रविण जाऊन उजविकडच्या टॉप वर झेंड्यासोबत महाराजांच्या जयजयकाराची घोषणा देऊन आला आणि अभ्या म्हणतो त्याप्रमाणे आम्ही सरसरत खाली 15-20 मिनिटांत उतरलोही!
आता तर हाताशी थोडा वेळ बाकी होता, पण ट्रेन करता आम्ही रोह्यालाच गेलो. काकांचे पैसे देऊन ट्रेन पकडली. गाडीतून अवचितगडावरचा झेंडा कॅमेऱ्यात टिपला आणि परततानाही येतानासारखीच खादाडी करत आणि मनसोक्त झोपून आम्ही डोम्बिवलीला उतरलो.
