माहुलीत पुन्हा एकदा जायचं ठरलं आणि १४ तारखेला संध्याकाळी एकाच गाडीत ६ व्यक्ती फिट करून आम्ही गुरू दादाच्या घरी पोहोचलो. वहिनींच्या रेडी जेवणाचा आस्वाद घेऊन पहाटेच लवकर जायचं या हेतूने सगळे भराभर झोपी गेलो. २ वाजता राजससुद्धा आसनगावाहून आला आणि काही वेळ विश्रांती घेऊन ३:३० ला उठायला सगळे सज्ज झाले (असं भासवलं). पहाटे पहाटे चहा आणि शिदोरीच्या भाकर्या घेऊन ५:३० ला सगळे घरातून निघालो आणि ट्रेक सुरू झाला.
६:३० पासून माहुली गडाच्या वाटेने जात जात पुढे गडावरच्या शिव मंदिराशेजारच्या टाक्यात पाणी भरलं आणि कणग्याच्या दिशेने डावीकडे पुढे निघालो. अडीच-एक तासात शिखराच्या पायथ्याशी पोहोचल्यावर राज, विश्वेश, सुमुख, अभिषेक (प्रत्येकी १ याप्रमाणे 'सर' जोडून घ्यावे) यांची रूट पाहणी सुरू झाली. सुरुवातीला क्रॅक मधून सहज १०-१५ फूट गेल्यावर क्रॅकच्या सरळ उभ्या चढावर खरा क्लाइंबिंगचा बिकट रस्ता सुरू होतो आणि ८०-९० फुटांवर उजवीकडे बाहेरच्या बाजूस वळून तिथून पुढे थोडा स्क्री - थोडा फिक्स दगड असा पॅच चालू होतो असा हा खालपासून एकंदर २०० वगैरे फुटान्चा (मापात माझ्या अमाप चुका असल्यास माफी. दुरुस्ती करेन, इनबॉक्स मध्ये सुचवावे.) सुळका आहे.
आज सुमुख लीड करणार आहे हे राज ने सुरुवातीलाच घोषित केल्याप्रमाणे राजे हार्नेस सामान वगैरे प्रबन्धास अभिषेकसह लागले. मी आणि पल्लवी खाणे, सेकेंड मॅनची बॅग भरणे, राजस-विश्वेश सोबत फोटोग्राफी जागा बघून घेणे वगैरे राज च्या सूचनेनुसार करून रेडी झालो. तेवढ्यात हार्नेस घाला असा इशारा मिळाला, आणि कुठेतरी लटकून फोटो काढायचेत आज असं डोक्यात आलं! सगळे तयार झाल्यावर नेहमीप्रमाणे सह्याद्रीचं गार्हाण घालून क्लाइंबिंगचा श्रीगणेशा झाला. मागोमाग मी पल्लवी व राज सगळे सोप्पी सुरूवात चढून बीलेयर अभ्याच्या इथल्या बोल्टपाशी आलो. आम्हाला आपली सेफ्टी कशी करावी याचं सेट-अप दाखवत राजने एकदम मस्त दगडाच्या आडोशाजवळ आमची व्यवस्था लावली. टाइमपास नॉट बांधत बसू यासाठी आणलेली स्लिंग माझा सेल्फ बनवली तेव्हाच काहीतरी भारी वाटलं होतं! ;) माहुलीत बेस जवळ एवढा परिसर मिळाल्याचा माझा पहिलाच अनुभव!
एवढ्यापर्यंत सुमुख २०-२५ फूट जाऊन ठेपला होता. अभ्या, राज, खालून विश्वेश या तिघांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन चालूच होतं. अधेमधे थोडसं थरथरत, मध्येच सरसरत पुढे जात सुमुख ने ४ बोल्ट पार केले आणि ८० फुटांवर आला. आता मात्र जरा गोची होती. चिमणी क्लाइंब संपून उजवीकडे बारीक जागेतून वळायचं होतं आणि कितीतरी प्रयत्नांनंतरही आपण अडकू शकतो याची सुमला प्रचिती मिळत होती. मग फार वेळ जातोय हे बघत राजदादा मदतीस सेकंड मॅन म्हणून मावळा मारीत गेला. हत्याकांड नव्हे, 'मावळा मारणं' म्हणजे नुसता रोप किंवा अर्ध्या जुमर् सह टॉपबिलेवर क्लाइंब करत जाणं.
आता अनुभवी व्यक्ती सोबत आहे म्हटल्यावर नवा हुरूप मिळाल्यासारखं सुम्याला वाटलं बहुतेक, पण आलटून-पालटून या दोघांनी अवघ्या एक तासात १ वाजेस्तोवर पुढचा पॅच पूर्ण केला. आम्हाला आमच्या बाजूने काही दिसेना, पण पलीकडून विश्वेशशी होणारं कॉलिंग ऐकून सगळं समजत होतं. राजसला मागून इथले सुंदर लॉँग शॉट्स मिळाले असतील, नक्कीच! आश्चर्यकारक गोष्ट याच क्षणी घडली, की अभ्या ऐवजी राज ने मला ३र्ड मॅन म्हणून यायला सांगितलं! त्याने आधीच रोप क्युड्यान्मधून वेगळा करून योग्य फॉल लाइन वर आणून ठेवला होता, त्यामुळे सरळसोट जुमारिंग करायचं होतं, नशीबाने यावेळी धीरही झाला, आणि अभ्याच्या, विश्वेश यांच्या मार्गदर्शनाने मी हळू हळू करत वरती गेले. उजवीकडचा एका मुळीपासून्चा क्लाइंबिंग पॅच सुद्धा जुमार् कमी वापरत करायला मिळाला! वरती जाऊन बघते तर काय! जवळपास १०० स्क्वेरफुट जागा फिरायला! वरती मागच्या बाजूस पायर्यांचा एक छोटासा रस्ताही आहे. थोडाफार दगडी सुळक्याचा शेवटचा भागसुद्धा आहे. इथे जरासा वेळ आम्ही विश्रांती घेत अभ्या आणि पल्लवीच्या एकत्रित जुमारिंग पूर्णतेची वाट पाहत पडलो. "१ तास झोपलोत आपण!" असं म्हणत सुमुखने उठवलं, आणि आता मात्र सूत्रे हाती घ्यायला राज सर खाली गेले. मला थोडीफार रोप फिक्सिंग ची कामं सांगत त्याने पल्लवीला वरती आणले आणि सर्वांचे सेल्फी, टाइमर फोटो झाल्यावर एकेक करून आम्ही रॅप्पेल करत खाली उतरलो. यू टाकून अभ्या शेवटचा वरून खाली आला.
बेसपाशी न्याहारी करून संध्याकाळी अंधार होता होता गडाचा रस्ता न धरता अलीकडूनच आम्ही गुरूदादाच्या घरी पोहोचलो आणि चहा-कार्यक्रमाची चर्चा करून मोहिमेची सांगता झाली. :)

Kanaga, Mahuli