Articles and Blogs

लुइझा पिनाकल - Jan 28, 2015

Published on January 20, 2015 by Pratik Patil

शुक्रवार उगवला होता तरी "आम्ही गिर्यारोहकची" या वेळची वारी काही ठरली नव्हती. हा weekend मोहिमेशिवाय जातो की काय असेच वाटत होते, तितक्यात watsapp ने हाक दिली. राजने ग्रुपवर message टाकला होता. सोबत ५-६ पिनाकल ची यादी होती. अजय दादानेही काही सुळके सुचवले. शेवटी माथेरानच्या लुइझा(luiza) सुळक्यावर शिक्का-मोर्तब झालं. लागलीच टीमला messages गेले, येणारी मंडळी नक्की झाली. या वेळीची टीम तशी तुलनेत लहान होती. राज, विनय, विश्वेश, अभिषेक, अमोल, साईं, पल्लवी आणि मी अशी "अष्टपैलू" टीम लुइझाच्या मोहिमेसाठी सज्ज झाली.पनवेलला भेटून तिथुन धुदानी पर्यन्त बाइक आणि अजय दादाची कार घेऊन पोचायचं होतं. रात्रीत माथेरान चढून पहाटे पहाटे क्लाइम्बिंग सुरु करण्याच आमचा मानस होता. माथेरानच्या लुइझा पॉइंट पासून अंदाजे १५० फुटांवर हा पिनाकल आहे. पायथ्यापासून या पिनाकल ची ऊंची सुमारे २५० फुट भरेल. माथेरानचा डोंगर आणि लुइझा मध्ये एक मोठा दगड अडकलेला आहे. अशा दोन डोंगरांमध्ये अडकलेल्या दगडाला चोक स्टोन(choke stone) म्हणतात. चोक स्टोन पासून लुइझाची ऊंची ९०-१०० फुट असेल. माथेरनपासून चोक स्टोन पोचायलाच जवळ पास २०० फूट rappelling करावं लागतं. या चोक स्टोन पासून सगळ्याच टीम ने क्लाइंब करायचा असा बेत ठरलेला.


अजय दादा आम्हाला पिक करण्यासाठी नवी कोरी SUV घेऊन स्टेशनला आलेला. राज विनय आणि अमोल आधीच नेहाच्या घरी पोचले होते. सगळे तिथे पोचल्यावर दादाने दिलेली आइसक्रीम पार्टीची मजा घेऊन,कारच्या carrier वर सामान बांधायला घेतलं राहुलची कमेंट्री चालूच होती म्हणा."अरे विनय तू बिंदास बांध रे सामान, दादाची xylo काय तुटायची नाय." असं राहुलनं म्हणायला आणि carrier चा बोल्ट उडायला एकच गाठ पडली. "कावळा बसायला आणि फांदी तुटायला... " अशी गत. आम्ही ८ जणं, दादा आणि राहुल असे सगळेच xylo ने निघलो. दादाचाच आग्रह आणि SUV ची ऐसपैस जागा म्हणून मग डोम्बिवलीकारांनी बाइक्स तिथेच सोडल्या. आता दादाची ही SUV महिंद्रा मोटर्सने बनवली होती की बोइंगने हा वादाचा विषय आहे, पण दादा कार चालवत असताना आम्हाला मात्र हवेत उड़त असल्यासारखेच वाटत होते. दादाच्या या fast and furious ड्राइविंगने सगळ्यांना मात्र पुरत गार केल. राजला रात्रीच्या जेवणाची चव मिनिटा -मिनिटाला चाखायला मिळत असावी कदाचित, त्यामुळे तो पूर्णवेळ अगदी शांत बसलेला होता. रात्री १ च्या सुमारास आम्ही धुदानीत पोचलो. दादा आणि राहुल तिथंच निरोप घेऊन पनवेलला परत गेले आणि आम्ही माथेरानच्या दिशेने चालू लागलो. गावातून जातना एक गावकरी दिसला. राज आणि विश्वेश एकदा वाट नक्की बरोबर आहे कि नाही याची खातरजमा करायला म्हणून त्याच्या दिशेने गेले तर या पठ्याने धूम ठोकली. शेवटी एका तेज-"तर्रार" मामाने पथ प्रदर्शीत केला आणि आम्ही लुईझाच्या वाटेला लागलो. गावापासूनची वाट अगदी सरळ आहे. पुढे उजवीकडचा फाटा लुइझाच्या पायथ्याला जातो. ही वाट बऱ्यापैकी सरळ आहे. डावा फाटा वर माथेरानच्या दिशेने जातो. अंदाजे अर्धा डोंगर चढ़ून गेल्यावर एक लहानसे देऊळ आहे. देवळासमोर विसाव्यासाठी चांगली प्रशस्त जागा आहे.लुईझा पॉइंटला पोचल्यावर रात्रीच्या अंधारातच pinnacle ची प्राथमिक पाहणी झाली; मोहिमेचा कच्चा आराखडा तयार करून सगळे पोटपुजेला बसले.


दीक्षांत समारंभ


सकाळी ७ च्या सुमारास तयारी सुरु झाली. अभ्या, अमोल आणि विनय पाण्याच्या बंदोबस्तासाठी निघाले. राज आणि विश्वेशने पुन्हा एकदा लुईझाची पाहणी करून घेतली, आणि "आज प्रतिक लीड क्लाइंब करणार" अशी राज सरांची घोषणा झाली. आज पर्यन्त मुंब्र्याला केलेल्या सरावाव्यतिरिक्त थोडाफार बिले देण्याइतपतचा काय तो माझा अनुभव; त्यामुळे लीड क्लाइंब मला करावा लागेल अशी पुसटशीही कल्पना मला नव्हती. अमोल सेकंड मॅन होता.


तो, मी आणि अभ्या rappel करत चोक स्टोन पर्यन्त पोचलो. तिथे भक्कम असा बोल्ट होता तरी तिघांनी एकाच बोल्टवर anchor करणे जोखमीचे होते, म्हणून अभ्याने तिथे एक पेग मारून त्यावर anchor केले. चोक स्टोन वरुन पहिली मूव्ह काहीशी आव्हानात्मक गेली. सुरवातीच्या १५-२० फूट नंतर तुलनेत रूट सोपा आहे. विनय माथेरानच्या डोंगरावर रोपच्या आधारने जवळजवळ लटकतच मला मार्गदर्शन करत होता. क्षण-क्षणाला summit जवळ येत होतं. स्क्री जवळ पोचलो. "पाय ठेवण्याआधी माती साफ करून घे. स्क्रीवर हवं तर खोदुन पायऱ्या कर" समोरच्या डोंगरावरून विनय सूचना देत होता. इथून जरा सावधगिरी बाळगावी लागणार होती. आता summit पर्यन्त कुठेही बोल्ट नव्हता. शेवटी स्क्री ही पार करत summit गाठलं. जवळपास १५-२० मिनिटांत क्लाइंब झालं.


शिखर


वर ३ पेग मारलेले होते आणि तिन्ही पेग टेपने आणि स्लिंगने जोडलेले होते. ३ पैकी २ पेग काहीसे सैल होते तर मजबूत बसलेल्या पेगमधून रोप टेप आणि स्लिंगमुळे रोप पास होत नव्हता. म्हणून मग त्यातल्यात्यात बऱ्यापैकी असलेल्या दुसऱ्या पेगवर रोप anchor करून अमोल क्लाइंब करून येईपर्यंत मी पेगवरच बसून राहीलो. पाठोपाठ विनय ही आला. याआधी एकदाच सह्याद्रीची भेट घेतलेला साई कुमार ही वर आला. बिले रोपला धरून "बिले tight" का म्हणु नये हे त्याला दुखऱ्या बोटांनी चांगलाच समजावून दिलं. आता पल्लवीने क्लाइंब सुरु केलं. काहीशी निवांत होती ती. विनयने मग तिला जरा जास्तच tight बिले द्यायला सुरवात केली आणि तिला पटपट वर यायला "प्रोत्साहित" केले. तिची ही त्रेधा पाहताना आमची मात्र हसुन पुरेवाट झाली. सगळे वर पोचल्यावर अभ्याही आला. विश्वेश आणि राज माथेरानच्या डोंगरावरून फोटोग्राफी करत होते. बाकी पूर्ण टीम pinnacle वर पोचली.


पूर्ण टीम


pinnacle वर महाराजांची सुबक मूर्ती कुणी आणून ठेवली होती. नंतर तिथल्या गावकऱ्याकडून कळले की इको पॉइंट वरुन कोणीतरी ही मूर्ती दुर्बिणीने दाखवून पैसे कमवतो. सोबत महाराज इथे लुइझा पिनाकलवर येऊन गेले असा "इतिहास" ही सांगून मोकळा होतो.


शिव छत्रपती


उतरायसाठी तयारी विनयने सैल पेग काढून पुन्हा व्यवस्थित मारले. ख़राब झालेली स्लिंग काढून टाकली आणि rappelling साठी सेटअप तयार करून घेतला. एकपाठोपाठ एक सगळे लगेचच उतरुन आलो. १२:३० पर्यन्त windup सुद्धा उरकलं. सामानाची बांधाबांध चालू असताना एक माकड हळूहळू पुढे येत होता. आमच कोणाचाच त्याच्याकडे लक्ष गेल नाही. भाकरीची पिशवी त्याने हेरून ठेवली होती. तो पिशवी उचलणार इतक्यात अभ्याचं लक्ष गेलं आणि भाकरीच्या तुकड्यासाठी आलेलं ते माकड़ चार मराठी शिव्या शिकून गेलं. अमोलनं तर अजुन पुढची पायरी गाठली. आम्ही जेवत असताना एक माकड अमोलवर चाल करून आलं. कोणाला काही सुचायच्या आत अमोलने हातातल्या भाकरिनिशी त्या माकडच्या नाकवर असा ठोसा लगावला की ते अक्षरश: उलटं पालटं झालं.


जेवण झाल्यावर तासभरासाठी झोप घेऊन आम्ही उतरायला सुरु केलं. सगळे मस्त धावतच उतरत होते. धुदानी गाव हाकेच्या अंतरावर असेल. समोर कड़क इस्त्रीचा शर्ट आणि फॉर्मल पॅंट घालून अजय दादा धावत वर येत होता. त्याचं काम उरकुन तो सरळ इथे आम्हाला परत न्यायला कार घेऊन आला होता. जिव्हाळा की काय म्हणतात तो हाच.