Articles and Blogs

Bhairavgad Climbing - Jan 10 & 11, 2015

Published on Feb 03, 2015 by Pratik Patil

ताडोबाची जंगल सफारी उरकुन परतत होतो तेव्हा अमोलचा message आला आणि भैरवगड (मोरोशी) ची प्रस्तररोहणाची मोहीम नक्की झाली.


भैरवगड तसा फार अजस्त्र नाही. लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत म्हणजे भैरवगड. भूरचनाशास्त्रमध्ये अशा रचनेला "डाईक " म्हणतात. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे, माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे.


भैरवगड


भैरवगडच्या पलीकडील धारेवर कातळत खोदलेल्या पायऱ्या आहेत. काही पायऱ्या चढून गेल्यावर खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. पहरेकऱ्यांसाठी निवारा म्हणून या गुहेचा वापर होत असावा. या गुहेच्या पुढच्या पायऱ्या उध्वस्त केल्या आहेत. आमची मोहिम मात्र या वाटेच्या अगदी दुसऱ्या टोकाच्या कातळकड़याच्या बाजूने प्रस्तररोहण करीत चढण्याची होती.


शुक्रवारी रात्री डोंबिवलीवरुन कार आणि बाईक वरुन आम्ही गिर्यारोहक भैरवगडाकडे रवाना झालो. रात्रीच्या गारठ्यातून भरधाव वेगाने बाईक पळवतानाची मजा काही औरच असते. असेच वेगाने अंतर कापत आम्ही निघालो होतो. टोकावड्याला पोटपुजेसाठी थांबायचे होते म्हणून बाईकने जरा जास्तच वेग घेतला होता की इतक्यात पोलिसाच्या तपासणी पथकाने बाईक्स अडवल्या. जगातील इतर सर्व मामांच्या विपरीत हा पोलीस मामा पोस्त देत नाही तर घेतो हे चांगलेच ठाऊक असल्याने आम्हीही तयारीत होतोच. पण आम्ही क्लाईंबिंग साठी निघालोय हे कळताच त्यांनी जुजबी चौकशीकरून सोडून दिले. वर पाठीवर कौतुकाची थाप दिली ती वेगळी, आणि आमचा पुढचा प्रवास बिनदिक्कत सुरू झाला. भैरवगडचा पायथा म्हणजेच मोरोशी गाठून लगेचच चढाई सुरू केली. सारेच भलत्या जोशात होते. झपझप अंतर कापीत जात होतो. तास-दिड तासात भैरवगडाच्या माचीवरील जंगलात पोचलो. क्षणभर विसावा घेत पुढच्या योजना आखल्या गेल्या. माचीवर कँप न करता कड्याच्या पायथा रात्रीच गाठायचा आणि तिथे कँप लावायचा अस ठरलं. त्यामुळे क्लाईंबिंग सुरू करताना सगळे ताजेतवाने असतील. माचीपासून ट्रॅवर्स पर्यंतचा प्रवास अगदी आरामात झाला. ट्रॅवर्सवर वाट अशी काही दिसत नव्हती. राहुल आणि सर्वेश आमच्या आधीच भरभर चढून गेले होते. त्यांच्या पावलांनी तुडवलेल गवत हिच आमची वाट. एका बाजूला भैरवगड आणि दुसरीकडे तिखट उतारावरची कारवी. पायाखालची माती मी म्हणत होती. तळपायाला फोड आले आहेत जणू, इतक्या काळजीने पाऊल टाकावे लागे. जरा चुक झाली की माती निसटलीच. अशाच एका उतारावर पराग घसरला. माती निसटतच होतती. त्याला हलता येईना जसा तो उठण्याचा प्रयत्न करे तसा आणखी खाली घसरत जाई. सुदैवाने खालची कारवी बर्‍यापैकी पक्की होती तिच्या आधाराने त्याने स्वतःला सावरले. मागुन येणार्‍या सुमुखने मग तिथे पायर्‍या खोदल्या आणि पडझड थांबली. 15-20 मिनिटाच्या त्या ट्रॅवर्स नंतर भैरवगडाच्या कड्या समोरील धारेवर आम्ही पोचलो. तिथे बेस कँप सेट केला. झटपट जेवण उरकून सगळ्यांनीच पाय पसरले. तास दोन तासाची झोप घेण खाण्याइतकच गरजेच होत.


आम्ही गिर्यारोहक


सकाळी सुर्योदया सोबत राजची हाक ऐकू आली .तसे फ्रेश होऊन सगळे कामाला लागले.राज क्लाईब करणार होता तर राहुल त्याला बिले देत त्याचा सेकंडमॅन म्हणून जाणार होता. सोबतीला अमोल ही होता. तिघांनी जुजबी न्याहरी करून तयारी सुरू केली. अजयदादा स्वतःसगळ्या तयारीवर नजर ठेवून होता.थोड्याच वेळात सगळे भैरवाच्या त्या अजस्र कड्यासमोर सादर झाले. दगडांच्या देवाला, सह्याद्रीला साकडं घालून राजने क्लाईंबिंग सुरू केलं.ज्या वेगाने राज क्लाईंब करत गेला, तो पाहून आम्हा सर्वांचाच उत्साह दुणावला. तंत्रशुद्ध गिर्यारोहणाचा नमूना पेश करत राजने पहिली लेज गाठली पाठोपाठ राहुलही जुमारींग करत तिथे पोचला.


लगेचच राजने पुढची चढाई सुरू केली.आणि बघता बघता सेकंड लेजवर पोचला.राजने तिथे स्वतःला अँकर केले. काऊटेल अँकर केली.राहुल पुढे जाण्याआधी अमोलने पहिली लेज गाढली. आता तो पहिल्या लेजवर राहून राहुल पुढे जाणार होता पण का कोण जाणे जुमार आणि रोपचं काहीतरी बिनसलं. राहुल जिव तोडून जुमार आणि रोपची विनवणी करत होता. पण पेच काही सुटेना. अजयदादाची करडी नजर सगळ टिपत होतीच. इथे राहुलचे प्रयत्न चालू होते, अन तिथे राज सरांमधला किशोर कुमार जागा झाला आणि त्यांन बोल्टवर लटकतच मोठमोठ्याने गाणी गायला सुरुवात केली. सुदैवाने राहुलला लवकर यश आलं आणि जुमार-रोपचं नातं पुन्हा सुरळीत झालं. आणि आमचे कान आणि जीव दोन्ही भांड्यात पडले. पुढची चढाई तुलनेत कठीण होती. निदान खालून पाहताना तरी मला कठीणच वाटत होती. पण राज सरांसाठी नाही. तो आपल्याच तो-यात क्लाईंब करत निघाला होता. तिसरी लेज तुलनेत प्रशस्त होती. तिथे पोचुन राजने राहुल आणि अमोलला जुमारने वर घेतले. वर पोचल्यावर तिघांनी विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि खाली आम्ही पोटपूजा उरकायला घेतली .


तिसर्‍या लेज पासुन पुढे एक आव्हानात्मक ट्रॅवर्स होता. आणि इथे राजच्या नजरेतून वरचा एक बोल्ट निसटला त्यामुळे राजने जरा खालूनच ट्रॅवर्स पार करायला सुरुवात केली. आता राजच्या प्रवासात त्याला अंदाजे 50-60 फुटांपर्यंत बोल्ट मिळणार नव्हते. राजच्या हे लक्षात येईपर्यंत त्याने तो ट्रॅवर्स बिनदिक्कत पार ही केला. त्याच्या मागोमाग राहुल आणि अमोल तिथवर पोचले. तिघांची पुढची चढाई बेस कँपमधून दिसत नव्हती. इथुन पुढे राजने अल्पाईन सिस्टम वापरत बेस कँप बरोबरचे बंध तोडून दिले. अर्थातच वाॅकीटाॅकीवर संपर्क कायम होताच. गिर्यारोहकांचा चमु द्रुष्टीआड होताच आम्ही कँप कडे लक्ष वळवले. कँप मधले पाणी संपले होते. अजयदादा, सर्वेश, वासुदेव आणि मी पाणी आणण्यासाठी निघालो.पाण्याच्या टाक्यावर आमचा गप्पांचा फड मस्त रंगला होता. समोर हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा दिमाखात उभे होते. पलीकडे आजोबा पर्वताची अजस्र भिंत लक्ष वेधून घेत होती. आम्ही सगळेच आता सैलावलो होतो. पण अजयदादा तिथून ही बेस कँप आणि गिर्यारोहक यांच्याशी वाॅकीटाॅकीवर संपर्क ठेवून होताच.


राज जेव्हा open book मध्ये पोचला तेव्हा आम्हा सगळ्यांनाच शिखराचे वेध लागले. सुमुख आणि मी त्या तिघांसाठी रसद घेऊन निघालो. भैरवगडाच्या पलीकडच्या तुटक्या पायर्‍यांच्या वाटेने आम्हाला शिखर गाठायचे होते. जवळपास पळतच आम्ही निघालो.राज वर पोचायच्या आधी आम्ही वर पोचणं गरजेचं होतं. सुमुखने रोप घेतला होता त्याचा फायदा आम्हाला तुटक्या पायर्‍यांवर झाला. रोपचा मानसिक आधार घेत सुमुखने तो अवघड टप्पा पार केला. मागोमाग मी ही पोचलो. जवळपास अर्धा पाऊण तासात आम्ही शिखर गाठले.


भैरवाच्या शिखरावरून राज सरांच शिखर निवडुंगातुन डोकावताना आम्ही पाहिले. राजच्या क्लाईंब लाईनच्या डावीकडे 70-80 फुटांवर भरभक्कम असा बोल्ट सुमुखने शोधून ठेवला होता. राज पासून या बोल्ट पर्यंतच्या वाटेवर निवडुंगही तुलनेत कमी होते. त्यामुळे वाटही सोईस्कर होती. पण राज मुळचा सरळमार्गी, तो निवडुंगातुनच सरळ मार्ग काढत वर पोचला. उद्देश एकच, रोपला शक्य तितके सरळ ठेवायचे जेणेकरून राहुल आणि अमोलला जुमारींग करताना त्रास होणार नाही. राजने वर पोचून निवडुंगाच्या बुंध्याला रोप अँकर केला आणि भैरवाचा माथा जल्लोषाने दणाणून गेला. शिखर गाठले हे सांगण्यासाठी वाॅकीटाॅकीची गरजच भासली नाही. गडावरच्या वार्‍यानंच आमचा जल्लोष कँपात पोचवला होता. या जल्लोषात त्रिवेणी, वैदेही आणि वासुदेवच्या आवाजाची मात्र उणीव भासली. तिघेही परतीच्या वाटेवर होते. अभी आणि सर्वेश त्यांना पायथ्या पर्यंत सोडायला गेले. नेहा दुसर्‍या दिवशीच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी निखिल आणि राहुल सोबत मुंबईहून निघाली होती. अभी आणि सर्वेश तिला घेऊन पुन्हा परतणार होते.


आठ तासांच्या चढाई नंतर 10-15 मिनिटांचा विसाव्या घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली.सुमुखने तुटक्या पायऱ्यांजवळ रोप अँकर करून ठेवला होता, त्याचा आधार घेत मी तो टप्पा पार केला. सुमुखही लगोलग उतरला. बाकी तिघांनी रोपवरुन rappelling करत पायथा गाठला. अंधार पडतपडता आम्ही कँपमधे पोचलो ही. एकंदरीत पहिला दिवस यशाचा राहिला.


रात्रीच्या जेवणासाठी अमोलेने बटाट्याच्या रश्श्याचा फक्कड़ बेत केला होता. नाही म्हणायला पल्लवी, सुमुख आणि माझेही थोडेफार योगदान होतेच. दोघांनी भाजी चिरयला मदत केली आणि मी टॉर्चचा उजेड देत दोघांची बोटे कापण्यापासून वाचवली. :D आत्ता भाजीची चव म्हणा किंवा सपाटून लागलेली भूक म्हणा; पण भाजीचा एकही कण उरला नाही. ना पातल्यात ना जमिनीवर. अक्ष्ररश: सांडलेली भाजी ही पोरांनी फस्त केली. जेवणानंतर गप्पांची मस्त मैफील जमली. अजयदादाने सगळ्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि सुधारता येण्यासारख्या काही बाबी ही नजरेत आणून दिल्या.


दुसऱ्या दिवशी सुम्या आणि अभ्याने भैरवचा जुना रूट करण्याचा प्रयत्न केला; पण या रुट वरचे बोल्ट खूपच जीर्ण झालेले असल्यामुळे अवाजवी धोका न पत्करता परतीचा निर्णय घेतला. अर्थातच त्यांचे हे प्रयत्न चालू असे पर्यन्त बेस कॅम्पवरील आम्ही नवगीर्यारोहकांच्या चमूने भैरवच्या कड्यावर शक्यतितका सराव करून घेतला. परागने पहिल्या लेज पर्यंतचा टप्पा क्लाइंब करत फुटवर्कचे काही धड़े गिरवले तर त्याला बिले देत मीही उजळणी करून घेतली. सर्वेश आणि मी असेंडिंगचा (जुमारिंगचा) सराव करून घेतला. आमच्या या सरवाचं संचालन विश्वेशच्या हाती होते. सगळं windup झाल्यावर साई कुमारचा जन्मदिवस "गिर्यारोहक" स्टाइलने साजरा करून आम्ही भैरवगडचा निरोप घेतला.


सेल्फ़ी टाइम :D